Talathi office work शेती आणि जमिनीसंदर्भात कोणतेही काम असेल तर तलाठी कार्यालयात जावं लागतं. तसेच कार्यालयात जाऊनही कामे वेळेत होत नाहीत अशी अनेक लोक तक्रार करत असतात. मात्र आता या सर्व त्रासातून मुक्तता मिळणार आहे. जिल्ह्यातील 11 प्रकारच्या फेरफार नोंदींसाठी आता ‘ई-हक्क’ प्रणालीच्या माध्यमातून अर्ज करणे अनिवार्य करण्यात आले आहे. वारसा नोंद, मृत व्यक्तीचे नाव कमी करणे, बोजा चढविणे किंवा गहाणखत तयार करणे यासारख्या प्रक्रिया फक्त ऑनलाइनच पार पडणार आहेत. यामुळे अर्ज कोणत्या टेबलवर प्रलंबित आहे, याची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ही माहिती दिली आहे.
ई -हक्क प्रणालीचा वापर केला जाणार
तलाठी कार्यालयात कोणतेही कामकाज असले तरी अनेक नागरिक अद्याप ‘ऑफलाइन’ अर्ज सादर करतात. अशा अर्जांची नोंद ‘ऑनलाइन’ स्वरूपात करण्यात यावी आणि पुढील प्रक्रिया पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. ई-हक्क प्रणालीद्वारे फेरफार नोंदणीसाठी नागरिकांना 11 प्रकारचे अर्ज सादर करण्याची सुविधा देण्यात आली आहे. तथापि, ग्रामीण भागात ऑनलाइन अर्ज प्रक्रियेबाबत माहिती अभाव असल्यामुळे अनेक जण तलाठ्यांकडे प्रत्यक्ष अर्ज देतात. यामुळे अर्ज प्रक्रिया विलंबित होते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना ऑनलाइन नोंदीअभावी संबंधितांवर कारवाई करणे कठीण होते. जिल्ह्यात अद्याप ई-हक्क प्रणालीची 100% अंमलबजावणी झालेली नसली तरी ती प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रशासनाकडून सक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. Talathi office work
स्वतंत्र कर्मचारी नियुक्तीचा आदेश
महसूल विभागाकडून ई-हक्क प्रणालीच्या अर्जांचे मंजूरी प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डुडी यांनी स्वतंत्र परिपत्रक जारी करून तालुकास्तरावर तलाठी, प्रांताधिकारी यांना या प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निर्देश दिले आहेत. जर अर्जदार ऑनलाइन अर्ज करण्यास सक्षम नसेल तर तलाठी, मंडल अधिकारी, तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाने यासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करावा, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
‘ई-हक्क’ प्रणालीद्वारे कोणती कामे करता येणार?
- ई-करार नोंदणी
- बोजा चढविणे/गहाणखत तयार करणे
- बोजा कमी करणे
- वारसा नोंदणी
- मृत व्यक्तीचे नाव कमी करणे
- अज्ञान पालनकर्ता शेरा कमी करणे
- एकत्र कुटुंब व्यवस्थापक नोंदणी कमी करणे
- विश्वस्तांची नावे बदलणे
- खातेदारांची माहिती भरणे
- हस्तलिखित व संगणीकृत तफावत संदर्भातील अर्ज
- मयत कुटुंबातील वारसा नोंदणी
दरम्यान, या प्रणालीद्वारे अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता व वेगवान कार्यवाही सुनिश्चित करण्यात येणार आहे. Talathi office work